मुंबई : राज्यात एकीकडे थंडीचा कडाका वाढला असून दुसरीकडे ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पुन्हा एकदा बळीराज्याची चिंता वाढली आहे. हवामान खात्याकडून २८ आणि २९ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आज अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झालं असून पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे वातावरणाचा अंदाज घेत आपल्या शेतमालाची योग्य त्या ठिकाणी व्यवस्था करावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
हिंगोलीमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात थंडीचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळतं. बदलत्या हवामानाचा मात्र हरभरा गहू भाजीपाला आणि वर्गीय पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
२६ डिसेंबरपासून वायव्य भारतावर व २७ डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा व विदर्भाला यलो अलर्ट
हवामान विभागाकडून मराठवाडा आणि विदर्भात २८ आणि २९ डिसेंबरला पावसाची शक्यता असल्याचं भाकित करण्यात आलं आहे. त्यानुसार हवामान विभागानं मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत २९ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच, या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
















