नाशिक – नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार दोन्ही ठिकाणी विजयी झाले आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतराचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जाणवू लागले आहे.
नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश पवार यांनी विजय मिळवला. पवार यांनी ४९१३ मते मिळाली तर, भाजपच्या पराभूत उमेदवार विशाखा शिरसाठ यांना १५२५ मते मिळाली. सिडकोतील प्रभाग क्रमांक २८ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे मधुकर जाधव २८१२ मतांनी विजयी झाले. जाधव यांना ५८६५ मते मिळाली. तर, मनसेचे दिलीप दातीर यांना ३०५३ मते मिळाली.
भाजपाच्या सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी भाजपा नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. तर शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या दिलीप दातीर यांनी मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.