सांगली – राज्य सरकार सर्वच हळू हळू खुलं करीत आहे, कोरोना संसर्गामुळे खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आलेली राज्यातील ” धार्मिक स्थळं लवकरच उघडले जातील असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दि.७ रोजी पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्या प्रसंगी केल्यानं राज्यातील धार्मिक स्थळं लवकरच खुली होतील अशी चिन्ह दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज रत्नागिरी येथून सुरुवात केली. पक्षाची आढावा बैठक रत्नागिरी येथे पार पडली यावेळी ते बोलत होते.
सुदैवाने आपल्याकडे दुसरी लाट नाही
युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी-तिसरी लाट आली आहे. सुदैवाने आपल्या देशात तसा काही अंदाज नाही. आपण सर्वांनी योग्य खबरदारी घेतल्यामुळेच हे शक्य झाले. राज्य सरकार हळूहळू सर्व गोष्टी खुल्या करत आहेत. लवकरच सर्व धार्मिक स्थळ उघडले जातील.
या प्रकरणाचा पत्रकारितेशी संबंध नाही
अर्णब गोस्वामी विषयाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. या प्रकरणाचा पत्रकारितेशी संबंध नाही, अर्णब गोस्वामी यांचा तो वैयक्तिक विषय आहे. पोलीस त्यांच्यापद्धतीने कायदेशीर चौकशी करत आहेत.
महाविकास सरकारमध्ये नाराजी नाही
महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही नाराजी नाही. सर्व निर्णय एकमताने होत आहेत. दोन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर काही मतभेद असतील तर ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हे सरकार पुढील १५ वर्षे स्थिर राहणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. भाजपचे विकास मॉडेल फसवे होते भाजपाचे विकास मॉडेल हे फसवे होते, हे आता लोकांना कळून चुकले आहे. म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातही अनेकजण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत असंही ते यावेळी म्हणाले.
















