जळगाव, (प्रतिनिधी): सध्या तात्पुरते निलंबीत असलेल्या जेडीसीसी बॅंकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करुन इतरांसोबत संगनमत करुन बनावट व खोट्या सह्या असलेल्या विड्रॉल स्लिपच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मेहुणबारे पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल रावसाहेब देशमुख (देशमुख वाडी चाळीसगाव), रविंद्र विश्वास पाटील (तामसवाडी – चाळीसगाव), प्रविण शांताराम पाटील (रा. तामसवाडी – चाळीसगाव), तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी मालेगाव विभाग, तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी सटाणा विभाग, तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी दिंडोरी आणि तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी सामाजीक वनीकरण विभाग अशा सर्वांविरुद्ध हा गुन्हा मेहुणबारे पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे. लक्ष्मण देवराम पाटील (रा. द्रौपदी नगर जळगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादित म्हटले आहे की,दि. ०१/०७/२०१९ते दि.१५/११/२०२२ या कालावधीत जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगांव शाखा पिलखोड ता. चाळीसगांव येथे विशाल रावसाहेब देशमुख तत्कालीन शाखा व्यवस्थापक पिलखोड ता. चाळीसगाव हल्ली तात्पुरते निलंबित यांनी प्रशासन व्यवस्थापन विभाग यांनी त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर व दुरुपयोग करुन रविंद्र विश्वास पाटील, प्रविण शांताराम पाटील रा. तामसवाडी ता. चाळीसगांव, फॉरेस्ट विभाग मालेगांव, सटाणा व दिंडोरी, सामाजिक वनीकरण विभाग येथील तत्कालीन आरएफओ अधिकारी यांच्या सोबत कट कारस्थान व संगनमत करुन बँक शाखेत बनावट व खोटया सहया असलेले विड्रॉल स्लिपाव्दारे रक्कमा काढल्या आहेत.
शाखा व्यवस्थापक विशाल रावसाहेब देशमुख यांना सदरच्या विड्रॉल स्लिपवरील सहया या बनावट व खोटया असल्याचे माहिती असुन सुध्दा त्या खऱ्या आहेत असे भासवुन खऱ्या असल्याचे व्यवहारात वापर केलेला आहे.तसेच सदर बनावट सहया केलेल्या विड्रॉल स्लिपा या बँकेतुन परस्पर गहाळ करुन पुरावा नष्ट केलेला आहे. तसेच शेतकरी पिककर्ज भरणा रक्कमेत अपहार करुन त्यात बँकेच्या खात्यातुन रक्कमा काढुन त्या बँकेच्या वरीष्ठ कार्यालयाच्या लक्षात येवु नये म्हणुन बँक शाखेचा खोटा हिशोब ठेवला आहे.
दिनांक ०१/०७/२०१९ ते १५/११/२०२२ या कालावधीमध्ये चौकशी अहवालातील रकमा वर्गवारीने जमा नावे करुन रोखीने काढुन गैरहेतुने गैरव्यवहार करुन बँकेची दिशाभुल करुन वेगवेगळया व्यवहारात एकुण रक्कम रुपये १,५१, ७५, ४८२/- (अक्षरी रुपये एक कोटी एक्कावण लाख पंच्याहत्तर हजार चारशे ब्यांशी रुपये मात्र ) रकमेचा अपहार केलेला आहे. तसेच दि. ०१/०७/२०१९ ते दि.१५/११/२०२२ या कालावधीत ज.जि. मध्य. सह. बँक लि., जळगांव शाखा पिलखोड ता. चाळीसगांव या शाखेचे अंतर्गत करण्यात आला आहे.
















