भाजपा चोरांचा पक्ष होऊ लागला आहे का काय असं वाटू लागलं असल्याचा टोला वंचित आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. राष्ट्रवादी संधीसाधूंचा पक्ष होता. त्यामुळे ज्यांना आपल्याला पक्षातून जिंकता येणार नाही असं वाटतं होतं, त्यांना भाजपात गेल्यानंतर विजय होईल असं वाटत आहे.
त्यामुळे हे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. काँग्रेसचीदेखील हीच परिस्थिती आहे. दोघांचं पक्ष म्हणून असणारं अस्तित्त्व कमी होत चाललं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी चौकशी लागलेले सगळेजण भाजपात जात असल्या कारणाने भाजपा चोरांचा पक्ष होतोय का काय असं वाटू लागलं असल्याचा टोला लगावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणासंबंधी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी देशातील आरक्षण धोक्यात आलं असल्याचं सांगितलं. ज्यांना आरक्षण मिळतंय त्या सगळ्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा ज्याप्रमाणे मुफ्ती मेहबूबा यांना वापरत काश्मीरमध्ये पाय रोवला आणि नंतर कलम 370 काढून घेतलं त्याप्रमाणे सत्ता आल्यानंतर आरक्षण काढून घेतलं जाईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील निवडणुका संपल्यानंतर पूर्ण सत्ता हातात आल्यानंतर आरक्षण काढून घेण्यात येईल असा दावा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. आरक्षित वर्गाने सावध होण्याची हीच वेळ आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
जागावाटपांबद्दल विचारलं असता आम्ही काँग्रेसला ऑफर दिली आहे. नियमाप्रमाणे 22 ऑक्टोबरच्या आधी निवडणुका झाल्या पाहिजेत. आम्ही कोणासाठी थांबणार नाही, आम्ही आगेकूच करणार असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच आमच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांचाच आम्ही निवडणुकीसाठी विचार करणार. वंचित बहुजन आघाडी इथपर्यंत आणली त्यांचाच विचार करणार, बाहेरच्यांचा नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.