जळगाव – लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व उद्याचे कलावंत घडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा घेण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन जळगाव केंद्रावर दि. 6 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
रंगभूमीस उत्तम रंगकर्मींची कमतरता भासू नये आणि लहान वयातील कलाकारांतील कलागुणांना उत्तेजन व प्रोत्साहन देवून भावी काळात त्यांच्यातून उत्तमोत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने, महाराष्ट्र शासन या बालनाट्य स्पर्धांचे आयोजन गेली 16 वर्षांपासून करीत आहेत. यंदाच्या 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील मुंबई, वाशी, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर, नाशिक, जळगाव, नागपूर, अमरावती या 10 केंद्रावर दि. 3 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान होणार आहे. जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी दि. 6 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.
सोमवार (दि.6) सकाळी 9.30 वाजता छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असून, स्पर्धेकरिता प्रवेश विनामूल्य आहे. या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी व बालकलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी दि. 6 जानेवारी ते दि. 9 जानेवारी दरम्यान सकाळी 9.30 ते सायं. 6.00 दरम्यान आपली उपस्थिती द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे व जळगाव केंद्र समन्वयक सरिता खाचणे यांनी केले आहे.














