जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयातील करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव – करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असताना पालक आणि विद्यार्थ्यांकडून साधारणतः काही पर्यायांचाच विचार होतो. त्यामुळे केवळ ठरावीकच अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो आणि कालांतराने उत्तम करिअरचे स्वप्न भंगते. म्हणून दहावी आणि बारावीनंतर करिअरबाबत योग्य मार्गदर्शन घेऊनच पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, तसेच कालचा दिवस सरला आहे. आज नवा दिवस आहे. नवी सुरुवात आहे. तुमचे भविष्य आजपासूनच सुरू होत आहे. हे सत्य स्वीकारा. तुमच्या समस्यांचे तत्काळ निराकरण होईल.
उज्ज्वल भविष्यासाठी नवी सुरुवात करणे आवश्यक आहे असा सल्ला करिअर कौन्सिलर प्रा. राहुल त्रिवेदी यांनी विध्यार्थ्यांना दिला. आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, संत हरदासराम हिंदी हायस्कूल व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविध्यालयाच्या वतीने रायसोनी महाविध्यालयातील सभागृहात शुक्रवारी (ता. २२) आयोजित ‘दहावी, बारावीनंतरचे अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांतील संधी’ या निःशुल्क मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, प्रत्येकामध्ये अनेक गुण असतात, ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नुसत्याच नोकऱ्याच्या मागे लागू नका. स्वतःमधील प्रतिभा शोधा आणि कोणत्याही कामाबाबत कमीपणा बाळगू नका तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासह स्पर्धा परीक्षांची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळविण्याच्या त्यांनी विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या. स्पर्धा परीक्षांसाठी कठोर मेहनत, जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीसह अभ्यासातील नियमितता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेला शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रायसोनी कनिष्ट महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खराटे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत प्रा. दिपक पाटील यांनी सूत्रचालन करून आभार मानले. तर आयोजनासाठी प्रा. पल्लवी भालेराव, प्रा. उज्वला मालुसरे, प्रा. शितल किनगे, प्रा. सोनल तिवारी, प्रा. राखी वाघ, प्रा. शुभांगी अहिरे, आणि प्रा. संतोष मिसळ यांनी सहकार्य केले.















