पाचोरा : तालुक्यातील अतुर्ली येथे एक दुर्दैवी घटना घडली. येथील महिला आपल्या मुलासह फवारणी करण्यासाठी शेतात गेली असता पाणी काढत असतांना तोल जाऊन महिला विहिरीत पडली. आईला वाचवितांना मुलाचाही बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी घडली. नितीन पंढरीनाथ पाटील आणि त्याची आई प्रतिभा पंढरीनाथ पाटील (वय-४५) रा. अंतुर्ली ता. पाचोरा असे मयतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत असे की, प्रतिभा पंढरीनाथ पाटील यांचे अंतूर्ली शेत शिवारात शेत आहे. आज ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतात फवारणी करण्यासाठी मुलगा नितीन पंढरीनाथ पाटील याच्यासह गेल्या. दरम्यान, फवारणीसाठी पंपासाठी लागणारे पाणी घेण्यासाठी प्रतिभा पाटील ह्या दुपारी २ वाजेच्या त्यांच्या शेतातील विहिरीजवळ गेल्या.
विहिरीतून पाणी काढत असतांना त्याचा तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या. आई विहिरीत पडल्याचे पाहून मुलगा नितीन पाटील याने विहिरीकडे धाव घेतली. आईला वाचविण्यासाठी त्याने देखील विहिरीत उडी घेतली. दरम्यान विहिरीत गाळ असल्यामुळे आई व मुलगा यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळता परीसरातील शेतातील शेतकरी व नागरीकांनी धाव घेतली. तब्बल दोन तासानंतर दोघांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. पाचोरा ग्रामीण रूग्णालयात देाघांचे मृतदेह आणण्यात आले आहे.
तीन वर्षांपुर्वी नितीन पाटील यांचा भावाचे देखील विहिरीत पडून मृत्यू झाला होता अशी माहिती येथील नागरीकांनी बोलतांना दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.