जळगाव,(प्रतिनिधी) – तालुक्यातील पाचोरा रोडवरील रामदेववाडी येथे ७ मे रोजी झालेले ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून यातील दोघा आरोपीस मुंबईतून अटक केली आहे. चारचाकी वाहनाखाली आईसह तीन मुलांना चिरडल्याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. आरोपीवर कारवाई होतं नसल्याने पोलिसांवर देखील आरोप होतं होते मात्र दोघा संशयित आरोपीना उपचारार्थ मुंबईतील दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याने त्यांना अटक करणे शक्य होतं नव्हते अखेर पोलिसांनी दोघा आरोपीना आज अटक केली आहे.
संशयितांमध्ये बिल्डर आणि राजकारणीतील बड्या नेत्याच्या मुलाचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार आणि बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल या दोघांना पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले आहे.अर्णव आणि अभिषेकवर मुंबईत उपचार सुरू होते. हॉस्पिटलमधून दोघांना डिस्चार्ज मिळाल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ 7 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आईसह दोन मुले ठार झाली होती. या अपघातात मृत महिलेचा 12 वर्षीय भाचा गंभीर जखमी होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वच्छला उर्फ राणी सरदार चव्हाण (वय- 30), मुलगा सोमेश सरदार चव्हाण (वय-2), सोहम सरदार चव्हाण (वय- 7, सर्व रा.शिरसोली, ता. जळगाव) आणि भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (वय-12 अशी मृतांची नावे आहेत. मृत वच्छला चव्हाण या रामदेववाडी येथे आशा वर्कर म्हणून कार्यरत होत्या. तर या घटनेतील अपघातग्रस्त कारमधील तरुण जखमी झाले होते. त्यांना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
अर्णव अभिषेक कौल याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईला हलवण्यात आले होते. तर अखिलेश संजय पवार याचे जळगावात रक्ताचे नमुने घेण्यात आले, तर अर्णवला घेऊन जाणारी रुग्णवाहिका पारोळ्यात थांबवून तेथे रक्ताचे नमुने घेण्यात आले. दोघेही मुंबईत उपचार घेत होते. दोघांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांना जळगावात आणण्यात आले आहे.
पुण्यात वेगळा न्याय आणि रामदेववाडीत वेगळा का? अशा संतप्त सवाल जनमाणसातून उपस्थित करण्यात येत होता. अखेर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणी दखल घेत तडकाफडकी तपासी अंमलदार बदलून डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे संपूर्ण प्रकरण सोपवले. या घटनेत अर्णव अभिषेक कौल हा कार चालवीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.









