मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्यामुळे चर्चेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना मंगळवारी डोंबिवलीत भररस्त्यात भाजप पदाधिकाऱ्यांकडून साडी नेसण्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजप-कोंग्रेस घर्षण पुन्हा उजेडात
काँग्रेसमध्ये कट्टर नेत्यांपैकी असलेले पगारे यांनी पंतप्रधान मोदींचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले.
भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी, दत्ता माळेकर आदींनी पगारे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत, हात पकडून साडी नेसून निषेध व्यक्त केला.
व्हिडीओमध्ये दिसते की भाजप कार्यकर्ते म्हणत होते –
“पंतप्रधानांची बदनामी करायची तुमची लायकी आहे का?”
“पुन्हा असे करण्याची हिंमत कराल का?”
पगारे यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेदरम्यान जातिवाचक शिवीगाळही केली गेली.
काँग्रेसची प्रतिक्रिया
भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत, काँग्रेस शिष्टमंडळ कल्याण पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या कार्यालयात गेले. चर्चेदरम्यान मामा पगारे यांचा रक्तदाब वाढला आणि ते बेशुद्ध झाले, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.
काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी या प्रकाराचा कठोर निषेध व्यक्त केला आहे आणि भाजप कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
व्हायरल घटनेचा थरार
सामाजिक माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालेल्या या घटनेमुळे राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे. या घटनेनंतर राजकीय पक्षांतून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत आणि पुढील काही दिवसात या घटनेवर राजकीय रणनीतीत मोठे निर्णय अपेक्षित आहेत.
साडी हे शक्तीचं प्रतिक आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मोदींचा फोटो व्हायरल केल्यामुळे भर चौकात साडी नेसवणं, समस्त स्त्री शक्तीचा अपमान आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेच्या आणि मोदींच्या भक्तीत इतका मशगूल झाला आहे, की त्यांना कसलीच लाज, लज्जा राहिलेली नाही.
एकीकडे त्यांचा गावगुंड आमदार विरोधी पक्षातील नेत्यांच्या आई-बहिणींबद्दल अपशब्द वापरतो, दुसरीकडे कार्यकर्ते विरोधी पक्षातील कार्यकर्त्याला गाठून साडी नेसवतात, हे भाजपला चालतं का? आणि हे जर भाजपला चालत असेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा संविधानाला धरुन आंदोलनं करते, तेव्हा भाजपवाल्यांनी गळे काढू नये…
– यशवंत किल्लेदार
उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य | उपशहर अध्यक्ष मुंबई शहर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) | अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना