भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या भूषण, आदरणीय मा. प्रतिभाताई पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेण्याचा सन्मान श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्राचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिह पाटील यांना लाभला.

या प्रसंगी त्यांनी ताईंच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांना आदर व्यक्त केला. ताईंसोबत झालेला संवाद अत्यंत प्रेरणादायी ठरल्याचे पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे ताईंच्या प्रेमळ आग्रहाने त्यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली, हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेल्या प्रतिभाताईंचे व्यक्तिमत्त्व साधेपणा, संयम आणि दृढनिश्चयाचे जिवंत उदाहरण आहे. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. आजही आपल्या कृतीतून आणि विचारांतून त्या नव्या पिढीला मार्गदर्शन करत आहेत.
या भेटी दरम्यान प्रवीणसिह पाटील यांनी शौर्याचे प्रतीक असलेल्या हिंदुहृदयसम्राट महाराणा प्रताप यांची प्रतिमा आदरणीय ताईंना भेट दिली. या वेळी गुरुवर्य महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली.
कौटुंबिक वातावरणात झालेल्या या भेटीत ताईंच्या कन्या सौ. ज्योतीताई, जावईबापू, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे खान्देश विभाग अध्यक्ष विलाससिंह पाटील, बोदवड नगरसेवक भरतअप्पा पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्यध्यक्ष प्रविण सपकाळे तसेच रोशन राजपूत उपस्थित होते.