जळगाव | प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांच्यावर महानगरपालिका निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे भाजपाच्या निवडणूक तयारीला अधिक गती मिळणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, भाजपाने जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी चाळीसगावचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या दोन्ही नियुक्त्यांमुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने मजबूत आणि अनुभवी नेतृत्व पुढे केले असल्याचे स्पष्ट होत आहे.
या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार राजुमामा भोळे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की, ही जबाबदारी केवळ निवडणूक व्यवस्थापनापुरती मर्यादित नसून, भाजपाची विचारधारा, संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट करण्याची मोठी संधी आहे. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनात्मक ताकदीने काम केले जाईल.
या विश्वासाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण तसेच जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व शहर पक्ष संघटना, सर्व पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जळगाव महानगरपालिकेत भाजपाला भक्कम यश मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पक्ष संघटनेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन, एकजूट आणि सकारात्मक राजकारणाच्या बळावर जळगावच्या विकासासाठी ही निवडणूक लढवली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.









