मुंबई :मुंबईतील माहीम परिसरात तब्बल ६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त हुंड्यासाठी विवाहित तरुणीवर अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्याचार इतका भयावह होता की, पतीने केलेल्या मारहाणीमुळे पीडितेचा गर्भपात झाला. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर माहीम पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
थाटामाटात झाला विवाह
तक्रारदार तरुणीचा विवाह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माहीम येथील लाकडाच्या व्यापाऱ्याशी मोठ्या थाटामाटात झाला. वडिलांनी हुंड्यापोटी तब्बल ११ लाख रुपये रोख, १६५ तोळे सोने, २ किलो चांदी, एक कार दिली होती. याशिवाय, इस्लाम जिमखाना येथे तब्बल ३ कोटी रुपयांचा खर्च करून विवाहसोहळा पार पडला. विवाहावेळी सासरच्या मंडळींनी आणखी २१ लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार मागितल्याचं समोर आलं आहे.

६ कोटींच्या मागणीसाठी सतत छळ
सुरुवातीला संसार सुरळीत सुरू झाला. पण काही दिवसांनी पती, सासू, सासरे आणि नणंदेने व्यवसायासाठी आणखी ६ कोटी रुपये आणण्याचा तगादा सुरू केला. त्यासाठी पीडितेवर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.
गर्भवती असतानाही अमानुष मारहाण
छळाच्या या मालिकेदरम्यान पीडिता गर्भवती राहिली. पण यावरूनही तिच्यावर दबाव आणून गर्भपात करण्यास भाग पाडले गेले. विरोध केल्यावर पतीने तिला निर्दय मारहाण करत अक्षरशः पोटात लाथा मारल्या. यातून ती गंभीर जखमी झाली आणि अखेर तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिला घराबाहेर काढण्यात आले.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी १८ सप्टेंबर रोजी माहीम पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.