भंडारा जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. ३३ वर्षीय नराधमाने अल्पवयीन १४ वर्षीय मुलीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले. एवढ्यावरच थांबून न राहता, आरोपीने तिला लॉजवर नेऊन जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपीचे नाव जाहीर
आरोपीचे नाव प्रकाश सुखदेवे (वय ३३, रा. मोहाडी) असे असून तो व पीडित मुलगी हे दोघेही मोहाडी तालुक्यातील रहिवासी आहेत. अल्पवयीन मुलीशी मैत्री करून आरोपीने तिला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले.
लॉजवर नेऊन जबरदस्ती
यानंतर आरोपीने पीडितेला भंडारा शहराजवळील जमनी दाभा येथील साई लॉजवर नेलं. येथेही त्याने मुलीच्या मनाविरुद्ध जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध दर्शवला तरीही आरोपीने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने धैर्य दाखवत तिथून पळ काढला.
पीडितेची धाडसपूर्ण पावलं
१४ वर्षीय मुलीनं तात्काळ पोलीस ठाणे गाठलं. तिने आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत कलम 65 (1), 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
लॉज मालकावरही संशय
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, अल्पवयीन मुलीसह आरोपीला लॉजमध्ये प्रवेश कसा दिला गेला? लॉज मालकावरही कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
संतापजनक वातावरण
या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील अनेक संघटनांनी अशा नराधमांविरुद्ध कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच अल्पवयीन मुलींना अशा गुन्हेगारांपासून वाचवण्यासाठी समाजाने जागरूक राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.