मुंबई, नजरकैद न्यूज – राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघडपणे समोर आला आहे. तब्बल ६७ जागांवर झालेल्या बिनविरोध निवडींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, भाजपचे सर्वाधिक ४५ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी थेट शंका उपस्थित करत भाजपवर गंभीर आरोपांची झोड उठवली आहे.
या बिनविरोध निवडी म्हणजे लोकशाहीची हत्या असून, यामागे दबाव, धमकी आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा थेट आरोप अजित पवार यांनी केल्याने निवडणुकीपूर्वीच महायुतीतील कलह चव्हाट्यावर आला आहे.

“भाजप सत्ताकाळात दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी तयार” – अजित पवार
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांनी महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडत भाजपवर ताशेरे ओढले.
“माझ्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला होता. आरोप करणाऱ्यांसोबतच आज मी सरकारमध्ये काम करतो आहे. पण महापालिकांमध्ये भाजप सत्तेत आल्यापासून दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे,” असा घणाघाती आरोप अजित पवार यांनी केला.
बिनविरोध निवडी म्हणजे दबावाचे राजकारण?
अजित पवार यांनी बिनविरोध निवडींवर गंभीर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की,
“अर्ज भरलेल्या उमेदवारांचा सिनेस्टाइल पाठलाग करून माघार घ्यायला लावण्यात आलं. काहींना गाडीत बसवून धमकावण्यात आलं. कायदा–सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. ही लोकशाही नाही, ही दडपशाही आहे.”
भाजपची ‘राक्षसी भूक’; जमीन–भंगारानंतर ‘खोदाई माफिया’ अवतरले!
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अजित पवारांनी थेट भाजपवर निशाणा साधला.
“विठ्ठल–रुक्मिणी मूर्ती खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप ज्या तत्कालीन महापौरांवर झाला होता, तेच आज भाजपचे उमेदवार आहेत. भाजपची राक्षसी भूक वाढत चालली आहे. आधी जमीन माफिया, भंगार माफिया सक्रिय होते, आता ‘खोदाई माफिया’ही अवतरले आहेत,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
‘मोदी लाटेत माझेच सहकारी निघून गेले’ – अजित पवारांचा गौप्यस्फोट
पिंपरी-चिंचवडचा दाखला देत अजित पवार म्हणाले,
“२०१७ पर्यंत आमच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा दर्जा होता. ‘बेस्ट सिटी ऑफ इंडिया’चा पुरस्कार मिळाला होता. महापालिकेला कधी कर्जात टाकले नाही, उलट ठेवी वाढवल्या.
मात्र, २०१७ नंतर मोदी लाटेमध्ये माझेच अनेक सहकारी निघून गेले. आज जवळपास ८ हजार कोटींच्या ठेवी कमी झाल्या आहेत, पण त्या बदल्यात विकास कुठे दिसतोय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर; रवींद्र चव्हाणांचा इशारा
अजित पवारांच्या आरोपांना भाजपकडून तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले. पुण्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले,
“अजित पवारांनी आधी स्वतःच्या गिरेबानात डोकावून पाहावं. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्याआधी त्यांनी विचार करावा. आम्ही आरोप करायला सुरुवात केली, तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील. अनेक वर्षे सत्तेत असताना त्यांनी काम करायला हवं होतं,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
निवडणुकीआधीच महायुतीत धुसफूस; परिणाम काय होणार?
महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये आरोप–प्रत्यारोपांची धग वाढल्याने, ही धुसफूस युतीसाठी धोक्याची घंटा ठरणार का?
बिनविरोध निवडींच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद येत्या काळात निवडणूक रणधुमाळीत आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.















