जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी मोठी दुर्घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये ही घटना घडली. लँडिंगदरम्यान अजित पवार यांचे विमानाला अपघात झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अजितदादा पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची बारामतीमध्ये आज सभा होणार होती. या सभेसाठी अजित पवार सकाळीच बारामतीला विमानाने गेले. बारामतीमध्ये विमान लँडिग करत असताना अपघात झाला. अजित पवारांचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले आणि आग लागली. या विमानाचे तुकडे झाले. घटनास्थळावर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने धाव घेतली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. अपघाताची माहिती कळताच खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बारामतीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, या विमान अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.









