युवासेनेचे प्रांताधिकारी यांना निवेदन ; पारोळ्यासारखी कारवाई भुसावळात होणार का?
भुसावळ ;- भुसावळातील अनेक नामांकित माहविद्यालय आणि शाळांतील शिक्षक छुप्या पद्धतीने कोंचिंग क्लासेस किंवा खासगी शिकवण्या घेतात. तर अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना या शिकवण्या बंधनकारक देखील करतात. त्यामुळे पालकांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमधील शिक्षकांना विरोधात कारवाई करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांना युवासेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते त्यावर कोणतीही कारवाई तर झालीच नाही आता महाविद्यालयानेच टक्केवारीवर महाविद्यालयातच कोचिंग सुरू केले आहे. महाविद्यालयाचे ४०% व शिक्षकाचे ६०% अशी विभागणी केली जात आहे म्हणून आज दिनांक ९ जुलै रोजी युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, युवासेना शहर समन्वयक स्वप्निल पवार, शहर चिटणीस मयुर जाधव, उप शहरप्रमुख भुषण सोनार, उप शहरप्रमुख पवन बाक्से, दुर्गेश जाधव, गौरव पवार, म्रुगेन कुलकर्णी, शुभम गावंडे यांनी भुसावळ प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
गट शिक्षणाधिकारी घालताय शिक्षकांना पाठीशी
शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना पुरावे मागितले आहे. शिक्षकांची नावे सांगितल्यावर सुद्धा निवेदनात लेखी नमूद केले नाही असा अभिप्राय त्यांनी दिला. के. नारखेडे महाविद्यालयांच्या शिक्षकांनी दरवाजे खिडक्या बंद करून शिकवण्या सुरूच ठेवल्या असून शहरातील नामांकित महाविद्यालयाच्या शिक्षकाला विद्यार्थ्यांने खाजगी शिकवणी बंद झाली असे म्हटले तर “तू महाविद्यालयात येऊन भेट” अशी सूचना मॅथेमेटीक्सच्या शिक्षकाने दिली आहे. अर्थपूर्ण व्यवहारातून शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. भुसावळ शहरात शिकवणी घेणाऱ्या ३० शिक्षकांची व ३० खाजगी क्लासेसची पहिली यादी बुधवारी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडील बैठकीत सादर केली जाणार असून मुख्यमंत्री कार्यलयात फॅक्स केली जाणार आहे अशी माहिती युवासेनेचे चिटणीस मयूर जाधव यांनी दिली.
खाजगी क्लासेसने वाढवली फी:
युवासेनतेर्फे सुरू केलेल्या शिकवणी बंद आंदोलनांचा फायदा घेत खाजगी क्लासेसने फी मोठ्या प्रमाणात वाढवली असून सायन्स विभागाच्या एका विषयाची फी २२ हजार घेणे सुरू केले आहे. आधीच शालेय शिक्षक १५ हजार घेत होते आता खाजगी क्लास विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. इतक्या मोठ्या रकमेची फी घेऊन भुसावळ सारख्या शहरात शालेय शिक्षक व खाजगी क्लास चालक आयआयटी सारख्या नामांकित संस्थेत विद्यार्थ्यांना पाठवण्याची तयारी करीत आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.
खाजगी क्लासेस कडून जीएसटी वसूल करावा:
भुसावळ शहरात गल्ली बोळात सुरू असलेल्या सर्व खाजगी क्लासेची नोंदणी झालेली नाही. शालेय शिक्षक आपल्या पत्नी, मुले किंवा नातेवाईकांच्या नावाने क्लास चालवत आहे. विद्यार्थी व पालकांना आर्थिक कोंडीत पकडणाऱ्या क्लासेस कडून तसेच अश्या महाविद्यालयीन शिक्षक व संस्था कडून जीएसटी वसूल करावा. महाराष्ट्र शासनाच्या महसुलात वाढ होईल व शासन हाच पैसा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करू शकेल अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली आहे.
पारोळ्यात कारवाई झाली असून भुसावळ गट शिक्षणाधिकारी गप्प बसले आहेत. मागील एक आठवड्या पासून सकाळी ७ वाजता उठून नाहटा परिसर, हनुमान नगर, प्रोफेसर कॉलनी, शांती नगर, तापी नगर व इतर परिसरात व्हिडीओ शूटिंग करून पुरावे गोळा केले आहे, हे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे, आता फक्त कारवाईची वाट पाहत आहे अशी माहिती युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील यांनी दिली.