जळगाव, (प्रतिनिधी):- दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे विभागाकडुन इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगाव या संस्थेस दिव्यांग क्षेत्रात कार्य करीत असल्याबद्दल नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले आहे. त्याची मुळ प्रत आज जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र कार्यालयास प्राप्त झाली आहे.
सन 2018 पासून रेडक्राँस सदर केंद्राचे कार्यान्वयन करीत आहे.त्याआधी या केंद्राचे कामकाज शासनाच्या सामाजिक व न्याय विभागांतर्गत दिव्यांग विकास महामंडळामार्फत चालविण्यात येत होते. तथापि पुरेशा आर्थिक पाठबळाअभावी ते बंद होण्याच्या मार्गावर होते.
जिल्हाधिकारी हे सदर पुनर्वसन केंद्राचे तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. किशोरराजे निंबाळकर यांनी त्यावेळेस हे केंद्र रेडक्राँसने चालवावे अशी संकल्पना मांडली. रेडक्राँसच्या पदाधिकाऱ्यांनीदेखिल त्यांची सूचना मान्य केली.आता हे केंद्र पूर्णपणे रेडक्राँस कार्यान्वित करीत आहे. दिव्यांगांसाठी सर्वागीण विकासासाठी अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये स्पिच थेरपी,आँडीओ मँट्री,फिजिओथेरपी, समुपदेशन यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिवाय सहाय्यभूत उपकरणे यांचे मोफत वाटप,त्यासाठी त्यांचे प्रमाणिकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या अँलिम्कोमार्फत शिबिराचे आयोजन करणे, दिव्यांग व त्यांच्या पालकांना समुपदेशन करणे, दिव्यांग बालकांच्या पुनर्वसनासाठी शिघ्र निदान उपचार केंद्र असे अनेकविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सदर पुनर्वसन केंद्रातर्फे जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना उत्कृष्ट सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल रेडक्रॉस सोसायटीस शासनाच्या वतीने मागील वर्षी “दिव्यांग प्रेरणा पुरस्कार 2019 ” प्रदान करण्यात आला होता.
सदर प्रमाणपत्र हे दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी शासनाच्या वतीने दिला जाणारा परवाना असून, अत्यंत महत्वाचे असे दस्ताऐवज आहे.
केंद्राच्यावतीने अध्यक्षांच्या प्रेरणेने दिव्यांगांसाठी अनेकविध उपक्रम राबविण्याचा मनोदय आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सध्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन कर्णबधिर व्यक्तींकरीता इयर मोल्ड तयार करण्याचे युनीट सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून दिव्यांग व्यक्तींना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सहाय्यक साहित्य व अत्याधुनिक प्रकारातील कृत्रीम अवयव व सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 6 वर्षाच्या आतील दिव्यांग सदृश्य विकासात्मक बाधा व व्याधी असलेल्या बालकांच्या पुढील विकासाच्या दृष्टीने त्यांच्या करिता प्रि स्कूल व केयर सेंटर सुरु करणे, दृष्टी दोष असणाऱ्या बालकांसाठी लो व्हिजन सेंटर सुरु करणे अशा अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांचा समावेश आहे.
सदर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी गेल्या दिड वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत होता.अखेरीस
प्रमाणपत्र मिळणेकामी केंद्राचे व रेडक्राँसचे विद्यमान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे अत्यंत महत्वाचे योगदान लाभले. तसेच रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन,मानद सचिव विनोद बियाणी, सहसचीव राजेश यावलकर, रक्तपेढीचे चेअरमन प्रसन्नकुमार रेदासनी,नोडल आँफिसर जी.टी.महाजन व केंद्र प्रमुख एस. पी. गणेशकर व सर्व पदाधिका-यांचे देखिल मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.