जळगाव.दि.6 :- जळगाव शहरात पावसाळयाच्या दिवसात हातगाडयांवरुन उघडयावर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या चायनीज हातगाडयांच्या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम उघडली असून त्याचाच भाग म्हणून 3 जुलै 2019 रोजी महेश चायनीज नेहरु चौक, जळगाव या चायनीजच्या विक्रेत्याकडे अचानक तपासणी अनुषंगाने व्हेज मंचुरीअन, व्हेज नुडल्सचे नमुने विषयांकीत कायदयाअंतर्गत घेवून अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आहे.
अहवाल प्राप्त झाल्यावर त्यावर पुढील कारवाई घेण्यात येईल. यात बहीणाबाई गार्डनआणि हायवेलगतच्या 9 ठिकाणी चायनीज हातगाडयांची तपासणी करण्यात आली. त्या ठिकाणीच्या सर्व अन्नपदार्थ विक्रेत्यांना अन्न पदार्थ उघडयावर विकू नये, पिण्यायोग्यच पाणी ग्राहकांना पुरवावे, खादयपदार्थ तयार करणाऱ्या व्यक्तींच्या स्वच्छतेबाबत सर्व विक्रेत्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
हातगाडीच्या आजूबाजूचा परीसर हा स्वच्छ व ग्राहकांसोबतच परिसरातील नागरिकांचीही काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देवून खाद्यपदार्थ खाल्यानंतर राहिलेले अन्न,कागदी प्लेट,कागद वगैरे ज्या कचराकुंडी मध्ये कचरा टाकल्या जातात त्या झाकणबंद असणे आवश्यक असल्याचे विक्रेत्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व विक्रेत्यांनी कच्चे अन्नपदार्थ्यांचे खरेदीचे पक्के बिले नेहमी विक्री स्टॉलवर ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जळगाव श्री. यो. को. बेंडकुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.