जळगाव, दि.5 – महिलांचा सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. याकरीता वर्षानुवर्षांपासून शिलाई मशिन, ब्युटी पार्लर हे व्यवसाय करण्याचा सल्ला किंवा त्यासाठी आर्थिक मदत न करता, कौशल्य विकासासारख्या प्रशिक्षणाद्वारे मोबाईल किंवा संगणाकाच्या दुरूस्तीचे तंत्र अवगत करण्यास मदत करावी. महिलांचा गट तयार करून त्यांना गटशेती सारख्या काळाची गरज असलेल्या उद्योगांमध्ये सामावून घेतल्यास महिलांचा आर्थिक विकास होवून त्या खऱ्या अर्थाने सबला होतील. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी महिला जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत शासकीय तसेच अशासकीय सदस्यांना उद्देशून केले.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, सरकारी अभियोक्ता ॲङ केतन ढाके, समाजकार्य महाविद्यालय,आदिवासी विकास कार्यालय, समाजकल्याण कार्यालय आदि शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी तसेच अशासकीय सदस्य श्रीमती सना खान, भारती पाटील, किशोर पाटील, वासंती चौधरी आदि सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, महिलांच्या विकासासाठी शासन राबवित असलेल्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी महिला बाल विकास, समाज कल्याण आणि संबंधित विभागांनी सर्व योजनांची एकत्रित माहिती उपलब्ध करुन द्यावी. ही माहिती महिला प्रतिनिधीमार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यास मध्यस्थांची आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांचे विशेषत: कौटुंबिक वाद-विवाद सामंजस्याने मिटविल्यास वेळ, पैसा आणि कटुता कमी करता येईल. पिडीत महिलांच्या पाल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला संघटनांनी विशेष प्रयत्न करण्यासाठी प्रसंगी चाकुरीबाहेर जावून काही करता येईल का? याचा विचार करावा. जेणे करून पिडीत महिलांना सन्मान मिळून त्यांच्या पाल्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उपस्थित अशासकीय सदस्यांकडून सुचना मागितल्या व त्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही सांगितले.