पंचवटी – घोटी येथील अकरा वर्षीच्या पीडित मुलीला शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस दलाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. या मुलीला घोटी येथील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्यालयात प्रवेश मिळून देण्यात आला आहे.
घोटी पोलिस ठाण्यात अल्वपयीन मुलगी हरवल्याची तक्रार झाली होती. या मुलीचा शोध घेण्यासाठी घोटी पोलिस ठाण्याकडून ही केस अॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनीटकडे वर्ग करण्यात आली होती. या युनीटला गुन्ह्यांच्या तपास करताना मुंबईतील अंधेरी वेस्ट येथील सेंट कॅथरिन्स होम येथे पीडित मुलगी सापडली. त्यानंतर तिला बाल कल्याण समिती (बोरीवली वेस्ट)कडे पाठविण्यात आले. तेथून तिला अॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनीटच्या ताब्यात देऊन नाशिक येथील बाल कल्याण समितीसमोर आणले.
या समितीने पीडित मुलीला आईच्या ताब्यात दिले. या पीडित मुलीचे वय अवघे ११ वर्षे असल्याने तिला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, पुष्पा आरणे यांनी प्रयत्न केले. गट शिक्षणाधिकारी प्रतिभा बर्डे यांच्या मदतीने घोटी (ता. इगतपुरी) येथील कन्या विद्यालयातील तिसरीच्या वर्गात संबंधित मुलीला प्रवेश मिळून दिला.