- 12 व 13 रोजी समितीची भेट व पाहणी होणार
पाचोरा (प्रतिनिधी)- येथील पीटीसी संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या एम एम महाविद्यालयास येत्या 12 व 13 फेब्रुवारी रोजी पुनर्मूल्यांकनासाठी बेंगलोर येथील नॅक संस्थेची समिती भेट देऊन पाहणी करणार असल्याने महाविद्यालय नववधू समान सजले आहे. गेल्यावेळी महाविद्यालयास ‘बी’ श्रेणी मिळाली होती. यावेळी गुण व श्रेणी वाढ मिळविण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाने चांगलीच तयारी केली असून सर्व विभागअद्ययावत केले आहेत.
नॅक पाहणी निमित्ताने महाविद्यालयाच्या सर्व विभागांच्या इमारतींना आकर्षक व देखणी अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे. क्रीडांगणा सह इतर सर्व विभाग सक्षम व सजग बनवण्यात आले आहेत. प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात आल्या आहेत.
या महाविद्यालयात पीएचडी संशोधनासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास या विषयांचे सातत्याने मार्गदर्शन असते .मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र ,राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संगणकशास्त्र, गणित, वाणिज्य अशा विविध विषयांचे पदवी अभ्यासक्रम चालतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांना वाव मिळावा व राष्ट्रीय वृत्ती विकसित व्हावी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना, युवती सभा, कमवा व शिका योजना, विद्यार्थी कल्याण योजना असे विविध विभाग महाविद्यालयात कार्यरत आहेत .उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर अत्यंत भव्य असलेल्या महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर क्रिकेट, बास्केटबॉल ,व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो यासारख्या मैदानी खेळांचा सराव सातत्याने केला जातो. महाविद्यालय यंदा 50 व्या वर्षात पदार्पण करीत असून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण कमी खर्चात देण्याचा उद्देश महाविद्यालयाने साध्य केला आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी सांस्कृतिक विभाग सजग असुन युवारंगमध्ये सातत्याने महाविद्यालयाचा कौतुकास्पद सहभाग राहत आला आहे. तसेच लेखन व वाचन संस्कृतीचा विकास व्हावा म्हणून पोस्टर लेखन, वत्कृत्व,निबंध, काव्यवाचन, कथाकथन ,वाद-विवाद अशा विविधांगी स्पर्धांचे आयोजन व अंकुर नियतकालिकाचे अखंडितपणे दरवर्षी महाविद्यालय प्रकाशन करीत असते. म्हणूनच ग्रामीण भागातील परिपुर्ण शिक्षणाचे उत्कृष्ट केंद्र म्हणून या महाविद्यालयास लोकमान्यता मिळाली आहे .
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील पारदर्शकता, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थी गुणवत्ता वाढ व व्यक्तिमत्व विकासासाठी विविधांगी नावीन्यपूर्ण व कल्पक असे उपक्रम राबवले जातात. संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय चौफेर विकासासाठी सातत्याने धडपड व प्रयत्न करीत असते .आयक्यूएसी च्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ बी एन पाटील, उपप्राचार्य प्रा डॉ वासुदेव वले, नॅक समन्वयक प्रा डॉ पी बी सोनवणे यांच्यासह कुलसचिव, प्राध्यापक व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असतात. यामुळेच गेल्यावेळी महाविद्यालयास बी ग्रेड नॅक समितीच्या वतीने देण्यात आली होती .यावेळी गुण व ग्रेड वाढीसाठी महाविद्यालयाने सर्वार्थाने तयारी केली आहे.
नॅक समिती कडून होणाऱ्या पाहणी प्रसंगी ता 12 रोजी दुपारी अडीच वाजता महाविद्यालयातील माजी विद्यार्थी ,विद्यार्थिनी व पालकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.