पाचोरा – शहरातील नागसेन नगर सह इतर भागात व शहरालगतच्या वसाहतीत वाढत असलेल्या अस्वच्छते बाबत व त्यामुळे निर्माण होणाऱ्या रोगराई व आरोग्याच्या भीती बाबत नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नगरपरिषद अधिनियम 133 प्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन ज्येष्ठ दलित समाजसेवक अशोक महाले यांनी राज्यपालांसह राज्याच्या मुख्य सचिव व मंत्र्यांना पाठवले आहे.
या तक्रारवजा निवेदनाचा आशय असा की पाचोरा शहरातील स्वच्छतेकडे नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. स्वच्छते बाबतची प्रचंड अनास्था दिसत आहे. दलित वस्ती असलेल्या नागसेननगर भागात गटारी तील घाण काढली जात नसल्याने गटारी तुडूंब भरल्या आहेत. गटारी तील घाण पाणी रस्त्यावर येऊन ते सर्वत्र वाहते व काही ठिकाणी साचते. यासंदर्भात नगरपालिकेचे मुकडदम व कर्मचारी यांच्याकडे अनेकदा तक्रार व मागणी केली परंतु ते उडवाउडवीची उत्तरे देतात .कोठेही जा तक्रार करा आमचे कोणीच काही करून घेणार नाही. असे उर्मट भाषेत संबंधित कर्मचारी बोलत असतात.
स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने शहरातील रहिवाशांच्या व नागरिकांच्या आरोग्याची प्रचंड भीती वाढत आहे. नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहरातील व भुयारी मार्गातील भिंतींवर चित्र रंगवून शासनाच्या लाखो रुपये अनुदानाची उधळपट्टी करत आहे. स्वच्छते बाबत संदेश देणारे डिजिटल बॅनर लावून स्वच्छ व सुंदर शहराचा अविर्भाव दाखवला जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ज्या भिंती स्वच्छतेचा संदेश देत आहेत त्याच भिंतींच्या आड प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे. नागसेन नगर व इतर भागात प्रचंड घाण व दुर्गंधी वाढली असून स्वच्छतेचा आव आणणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही शरमेची बाब आहे ‘यासाठी जे कोणी जबाबदार आहेत त्या सर्वांची कसून चौकशी करून त्यांच्यावर नगरपालिका अधिनियम 133 नुसार कठोर कारवाई करावी. स्वच्छतेच्या कार्यात कसूर करणाऱ्या व नको त्या बाबींसाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रार वजा निवेदनावर अशोक महाले यांची सही आहे .
निवेदनाच्या प्रती राज्यपाल ,राज्याचे मुख्य सचिव, नगर विकास मंत्री, पालकमंत्री ,आमदार ,नगर विकास आयुक्त ,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आदींना पाठवण्यात आल्याआहेत. ही बाब संबंधितांनी गांभीर्याने घेऊन संबंधितांवर कारवाई न केल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल असाही इशारा अशोक महाले यांनी दिला आहे.
????