जळगाव – जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनी शेतकऱ्यांच्या सोईसुविधांसाठी पाणंद रस्ते आणि शेत रस्त्यांसाठी शासनाच्या मदतीने योजना राबवावी. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ना. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी होते. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ८१ मी.x६६ मी.आकाराच्या लिलाव शेडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाजार समितीच्या 7 कोटी 54 लाख रूपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना ना. पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्याला राजाच्या मंत्रीमंडळात नेहमीच पाण्याशी निगडीत विभाग मिळत आला आहे. आपल्याला मिळालेल्या विभागामार्फत आपण जिल्ह्याचा विकास साधणार आहोत. राज्यात महाआघाडीचे सरकार असून तीन पक्षांची शक्ती राज्याच्या विकासासाठी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील नागरीकांना शुध्द पाणीपुरवठा करण्याऱ्या खात्याची जबाबदारी मला मिळालेली असल्यामुळे नागरीकांना क्षारमुक्त पाणीपुरवठा होण्यासाठी आपण जाणीवपुर्वक प्रयत्न करणार आहे. ज्या गावांमध्ये सौरउर्जा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध आहे त्याठिकाणी असे प्रकल्प उभारण्याचा मनोदयही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात सहकारी संस्था टिकल्या तर त्यांचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल. जिल्ह्यातील चोपडा व मधुकर साखर कारखाना सुरु करण्यास आपण पालकमंत्री म्हणून बांधील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती जगन्नाथ पाटील यांनी केले. तर अतिथींचे स्वागत बाजार समितीचे सभापती जगन्नाथ पाटील, उपसभापती नंदकिशोर पाटील व संचालकांनी केले. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, माजी आमदार हरिभाऊ जावळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष घनःश्याम अग्रवाल, जिल्हा बॅकेच्या माजी उपाध्यक्ष इंदिराताई पाटील, अॅड. संदीप पाटील, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती ज्योती पाटील, उज्वला म्हाळके यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संचालक नारायण पाटील यांनी केले.













