मुंबई – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कुख्यात डॉन करीम लाला यांच्या भेटीबद्दलच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले असतानाच याच मुद्द्यावर बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणा-या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये,’ असा हल्लाबोल थोरात यांनी केला आहे.
थोरात यांनी ट्विट करत फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी लिहिलंय, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.’
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले, त्यावर थोरात यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे, पण भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.’














