मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यायचे का हे राऊत, पवार, उबाठांनी सांगावे
भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची मागणी
देवेंद्र फडणवीसांनी दिलेले मराठा आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालवले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सदैव मराठा समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे, त्यांच्या मागण्या पूर्ण करणारे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावले, या शब्दांत भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. खा. संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना श्री. बन म्हणाले की, मराठा मोर्चावर वायफळ बडबड करण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि राऊत यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण द्यायचे की ओबीसीतून द्यायचे याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीसह ‘मविआ’ ने भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.
यावेळी श्री. बन म्हणाले की, 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र 14 टक्के आरक्षण दिले होते मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकवता न आल्याने आरक्षण गेले. याला सर्वस्वी जबाबदार उद्धव ठाकरे आणि मविआ च आहे. पण महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आलं आणि हे आरक्षण कोर्टात टिकवण्याची जबाबादारी राज्य सरकारची आहे आणि हे आरक्षण नक्की टिकेल असा विश्वास व्यक्त करीत श्री. बन यांनी महायुती सरकारवर टीका करणाऱ्या राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीसांनी 54 शांततामय मोर्चे संयमाने हाताळले मात्र उद्धव ठाकरे एकाही मोर्चाला सामोरे गेले नाहीत त्यामुळे दुसऱ्यांना पळपुटे म्हणण्याआधी कोण पळपुटे होते याचा विचार करावा असा टोलाही श्री. बन यांनी राऊत यांना लगावला. मराठा समाज संयमाने, शांततेनं आंदोलन करत आहे मात्र संजय राऊत आगीमध्ये तेल ओतण्याचे काम करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
फडणवीस यांनी मराठा समाजाच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले
यावेळी श्री. बन यांनी मराठा समाजाच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचा विस्ताराने आढावा घेतला. श्री. बन म्हणाले की मराठा समाजाच्या कल्याणासाठी सर्वाधिक योजना भाजपा महायुती सरकारनेच दिल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला, 8 हजार 320 कोटींचे कर्ज वितरित झाले, 3.80 लाख विद्यार्थ्यांना 1293 कोटींचा शैक्षणिक निधी मिळाला. वसतीगृह, शुल्क सवलत, शिष्यवृत्ती, एमपीएससी-यूपीएससी तयारीसाठी मदत असे अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने प्रत्यक्षात आणले आहेत. सारथी संस्थेसाठी फडणवीस सरकारने 1024 कोटी रुपये दिल्याचेही श्री. बन यांनी अधोरेखित केले. उद्धव ठाकरेंच्या काळात सारथीसाठी दमडीची तरतूद झाली नाही, पण आमच्या सरकारने पुणे, खारघर, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, लातूर आणि नागपूरमध्ये सारथी ची विभागीय केंद्रे उभारण्यासाठी कोट्यवधींची मदत केली असे श्री. बन यांनी नमूद केले. |