जळगाव दि. ३० (प्रतिनिधी) : खान्देशातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारची असल्याने हे खेळाडू देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे या करीता सरकारचे क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञानाचे केंद्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ग्वाही विद्यापीठात वतीने दि. ३० जून रोजी आयोजित जिमखाना डे या कार्यक्रमात केंद्रीय राज्य व युवक कल्याण क्रीडामंत्री श्रीमती. रक्षा खडसे यांनी दिली.

यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य ॲङ. अमोल पाटील, डॉ. पवित्रा पाटील, प्रा. म.सु. पगारे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, अधिसभा सदस्य डॉ. एस.टी. पाटील, डॉ. आय.डी. पाटील, स्वप्नाली काळे (महाजन), क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना मंत्री खडसे म्हणाल्या की, खान्देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करून, नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून देश पातळीवरील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळांमध्ये सहभाग घ्यावा तशी तयारी करावी. चौकटी बाहेर जावून खेळाबद्दल विचार करावा. विद्यापीठात क्रीडा विज्ञान तंत्रज्ञानाचे केंद्र उभारणीचे आश्वासन देत विविध क्रीडा कोर्सेस विद्यापीठात सुरु करता येईल असे सांगून खेळाडूंनी भारत सरकारच्या क्रीडा प्राधिकरणांकडे (SAI) प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. क्रीडा क्षेत्रात करीअर घडविण्याची मोठी संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून घरघरात खेळ पोहचविण्यासाठी योजना तयार केली आहे. या योजनेचा लाभ विस्तारीत व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी केली. खेळांमधून सांघिक भावना वाढीस लागून मैत्रीपूर्ण वातावरण तयार होते असेही त्या म्हणाल्या.
व्यवस्थापन परिषद सदस्य व जिमखाना समितीचे अध्यक्ष ॲङ. अमोल पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थी खेळाडूंचा खेळतांना अपघात झाल्यास त्याकरीता मदतीची व्यवस्था होण्याकरीता विद्यापीठ खेळाडू अपघात विमा योजना सुरु करण्याची आखणी करीत आहे. स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरु केली आहे की ज्यायोगे खेळाडूं विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल.
अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, विद्यापीठाने दोन कोटी रूपयांची तरतूद क्रीडा विभागासाठी केली आहे. खेळाडूंनी केवळविद्यापीठ स्पर्धांपूरता मर्यादित न राहता देश पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पोहचता येईल यासाठी प्रयत्न करावे त्या करीता शारिरीक व मानसिक तंदुरूस्ती, सातत्य, सराव व क्षमता विकसित करणे त्याकरीता क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान अवलंब केला पाहिजे असे आवाहन करीत जे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये सहभागी होतील त्यांना विद्यापिठा कडून मदत केली जाईल असे आश्वस्त केले.
या कार्यक्रमात २०२३-२४ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सोनगीर महाविद्यालयातील प्रथमेश देवरे यास व २०२४-२५ या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून जी.टी.पी. महाविद्यालय नंदुरबार येथील रिंकी पावरा यांच्या जैन इरिगेशन पुरस्कृत खाशाबा जाधव सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. आजच्या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूं तसेच दक्षिण पश्चिम विभागीय, अखिल भारतीय, आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धा व क्रीडा महोत्सव स्पर्धा तसेच भारतीय विद्यापीठ संघात निवड झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, रौप्य पदक, कांस्य पदक प्राप्त खेळाडूंचा आणि नुकत्याच जाहीर झालेल्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशा एकूण २२० खेळाडू व महाविद्यालयातील ४६ क्रीडा संचालक यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यापीठातर्फे खेळाडू विद्यार्थ्यांसाठी केलेल्या भरीव मदतीची माहिती दिली. सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले…