जळगांव : सरकारच्या आधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर ‘कुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणा-या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 ह्या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील 365 दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणा-या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. या पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
ही पाहणी जळगाव जिल्ह्यात होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणा-या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणा-या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड ‘एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब’ आणि मागील ‘365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती’ यामधून करण्यात येणार आहे. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.
त्या अनुषंगाने माहिती संकलित करणा-या अधिकारी/कर्मचारी यांना सखोल प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे दि. 07 जानेवारी 2025 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती गोळा करणार आहे.
राष्ट्रीय नमुना पाहणी 80 वी फेरी अंतर्गत नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरीता घरी येणा-या अधिकारी/कर्मचारी यांचेकडून कुटुंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्वाची माहिती समजून घेण्यासाठी आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.