पाचोरा – भडगाव मतदार संघातील मतदार बांधवांनी माझ्या नेतृत्वावर व काम करण्याच्या शैलीवर विश्वास ठेवून मला 39 हजारांच्या मताधिक्याचा तसेच सलग तिसऱ्यांदा विजयी करून हॅट्रिकचा इतिहास रचला. या विश्वासाला मी कदापी तडा जाऊ देणार नाही.
पाचोरा – भडगाव मतदार संघ संपूर्ण राज्यात विकासाचा वेगळा पॅटर्न ठरेल अशी महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण कामे करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आमदार किशोर पाटील यांनी नव्याने बांधलेल्या शिवालय या संपर्क कार्यालयात बुधवार दिनांक 27 रोजी सायंकाळी आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी भाजपाचे मधुकर काटे , नंदू सोमवंशी , रवींद्र पाटील , उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर , माजी जि प सदस्य पदमसिंग पाटील , सुनील पाटील , प्रविण ब्राह्मणे,राजेश पाटील,आदि उपस्थित होते.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा – भडगाव मतदार संघातील मतदारांचे व महायुतीचे पदाधिकारी , कार्यकर्ते , समर्थक , हितचिंतक या सर्वांचे आभार व्यक्त केले. विरोधकांनी निवडणूक काळात केलेला अपप्रचार , जातीपातीचे राजकारण , विकास कामांवरील टीका याला मतदार बांधवांनी भीक न घालता माझ्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून मला हॅट्रिकचा मानकरी ठरवले. त्यामुळे आता माझाही विकास कामे करण्याचा आत्मविश्वास वाढला असून मला मंत्री म्हणून राज्यात काम करण्याची संधी व जबाबदारी सोपवली तर मी सक्षमपणे पार पाडून त्या संधीचे सोने करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मतदार संघात शांतता व विकास अबाधित राहील हे आश्वासन मी मतदारांना दिले आहे त्यासाठी मी कटिबद्ध असून मतदारसंघ एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे नियोजन आहे. रोजगार ,वीज , पाणी , रस्ते ,आरोग्य , शिक्षण , स्वच्छता अशा विविध कामांना त्वरित पूर्णत्वास देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. विजयी मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणी त्यांना छेडले असता पुढील काळात मतदार संघात कुणाचीही गुंडगिरी , दादागिरी , अन्याय , अत्याचार , अरेरावी खपवून घेणार नाही. येथे कायद्याचे राज्य आहे हे दहशत निर्माण करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे असे आव्हानही दिले.