जळगाव,(प्रविण सपकाळे)- आमदारकीच्या कार्यकाळात पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघात शासनाचा प्रचंड निधी आणत खऱ्या अर्थाने ‘विकास गंगा’ आणून जनतेत ‘कार्यसम्राट‘ आमदार म्हणून नाव लौकिक असणारे शिवसेनेचे आमदार किशोरअप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘निर्धार मेळाव्याला मात्र मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘दांडी’ मारल्याने पाचोरा – भडगाव मतदार संघात भाजपा नेमका कुठला ‘निर्धार’ करत असल्याची राजकीय चर्चा होतं आहे.
भाजपाच्या या कृतीवर पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून उघड नाराजी
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्यावतीनं “निर्धार मेळावा” आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. याच मुद्यावरुन शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेळाव्यामध्ये जे घडलं ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्याकडे मांडणार असल्याचं ते म्हणाले.
भाजपा – शिवसेना पक्षात दुरावा?
पाचोरा – भडगाव विधानसभामध्ये आमदार किशोरअप्पा पाटील व भाजपाचे अमोल शिंदे यांच्यात राजकीय वैर असल्याचं सर्वश्रुत आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत दोघे आमने सामने निवडणुक लढवीली होती त्यात किशोरअप्पा यांनी विजय मिळवला होता.अमोल शिंदे हे भाजपचे पाचोरा तालुक्याचे नेतृत्व करतात तर मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वीच पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजप शिवसेनेत दुरावा असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. पाचोरा येथे आयोजित शिंदे सेनेच्या निर्धार मेळाव्याला भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देवून ही त्यांनी गैर हजेरी लावल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत वरिष्ठ नेते पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा – शिवसेना पदाधीकारी यांच्यातील दुरावा कसा दूर करतील व आमदार किशोरअप्पा पाटील यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग कसा मोकळा करतील याकडे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
भाजपच्या मनात नेमकं काय?
शिवसेनेचे आमदार किशोरअप्पा पाटील दोन टर्म पासून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याने आपल्या मतदार संघात मोठा निधी उपलब्ध करून विकास केला खरं, मतदारांची मन जिंकण्यातही आमदारांना यश आलं असताना मित्र पक्ष मात्र पाचोऱ्यात साथ देतांना दिसत नाही. निर्धार मेळाव्याला मित्र पक्ष म्हणून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी येणे अपेक्षित होते मात्र भाजपने दांडी मारून या मतदार संघात भाजपाच्या मनात नेमकं काय सुरु आहे अशीच चर्चा घडवायला भाजपानं भाग पाडलं आहे.गेल्या विधानसभेत किशोरअप्पाच्या समोर तगडं आव्हान उभं करण्यात आलं होतं आताही तेचं होणार का? तसं झालं तर पाचोऱ्यात त्रिशंकू निवडणुका होतील असंच चित्र दिसत आहे. भाजपा शिवसेनाच्या वरिष्ठ नेत्यांना या दोन नेत्यातील दुरावा कमी करण्यात किती यश येईल हे लवकरच स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा एक संघ होते म्हणून देशात विपरीत वातावरण असताना सुद्धा जळगाव जिल्ह्यात दोन्ही जागा आपल्या निवडून आल्या आहेत, अशी आठवण देखील गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांना करुन दिली.लोकसभेप्रमाणं जर आपण विधानसभेत एकसंध राहिलो तर जळगाव जिल्ह्यातील 11 ते 11 जागा निवडून येऊ शकतात, असंही पाटील म्हणाले. मात्र, आपल्यात फूट असणं हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे आहे, असा इशारा देखील पाटील यांनी दिला.दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये दिलजमाई होणार का हे येत्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल.