जळगाव,(प्रतिनिधी)- भाजपाचे जळगाव लोकसभाचे विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील, पारोळा माजी नगराध्यक्ष या दोन बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतं असल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला हा धक्का मानला जात आहे, तसेच माजी आमदार शिरीष चौधरी देखील पुढील काळात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान आज भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही भेटीसाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले होते, दिवस भरातील घडामोडी पाहता जळगाव लोकसभा निवडणूक अनेकांची गणिते जोडली जाणार असून तर काहींची गणिते बिघडणार आहेत.
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश उद्या दु. 12.30 ला होण्याची शक्यता असून त्यांच्या सोबतच भाजपाचे अजून कोणते दिग्गज नेते भाजपाला धक्का देत शिवसेनेत पक्ष प्रवेश करतात हे पाहणे महत्वाचे ठरेलं.
दरम्यान खासदार उन्मेष पाटील यांनी मात्र मीडिया प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना सावध प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या भेटीनंतर मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, “मी आपला मनापासून आदर करतो. आपले सगळे प्रश्न, शंका, सूचना याबाबत लवकरच सविस्तर बोलेन. आता बोलणे उचित होणार नाही. लवकरच मोकळेपणाने संवाद साधेन. मी आणि संजय राऊत संसदेत सोबत काम केलं आहे. आमची संजय राऊतांशी आणि सहकाऱ्यांशी कायम चर्चा होत असते. त्यानिमित्ताने संवाद साधायला आलो. प्रत्येक गोष्टीत आपण राजकारण म्हणून पाहू नका. राजकारणापलीकडे मैत्री जपली गेली पाहिजे. आताच्या घडीला मैत्री जपली जात नाही आणि ती मैत्री जपण्याचा हा प्रयत्न आहे. बाकी काही नाही,” असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.