✍????किशोर रायसाकडा
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात भेसळयुक्त दूधाचा महापूर, सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ” या शीर्षकाखाली अनेकवेळा ब्रेकिंगच्या माध्यमातून वचक निर्माण झाला असला तरी सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न केला होता. या वृत्ताची दखल घेत बऱ्याचशा सुज्ञ नागरिकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन दुध भेसळीचा हा प्रकार खरा असून यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचे सांगत संतप्त भावना व्यक्त करत या दुध भेसळीच्या गोरखधंद्याचा भांडाफोड करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
यानुसार नजरकैद कडून खरा प्रकार काय आहे याकरिता योग्य पध्दतीने व सावध भुमिका घेत माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले असता एका मोठ्या शहरात मागील पंधरा वर्षे दुध डेअरी मध्ये काम केलेल्या परंतु आता शरिर साथ देत नसल्याने थकलेल्या एका व्यक्तीने नजरकैद कडे स्वताहून संपर्क साधुन सत्य परिस्थिती कथन केली आहे. या दुध डेअरी मध्ये काम केलेल्या व्यक्तीने दिलेली माहिती अत्यंत गंभीर स्वरुपाची असून जर हा प्रकार खरा असेल तर नक्कीच भविष्यात मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होतील यात शंका नाही.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संयोग क्रियेतून तयार होणारे दूध हे दिसायला जरी साध्या दुधासारखे असले, तरी चवीला मात्र शंकास्पद वाटते आणि अशा दुधामध्ये पौष्टिक गुणधर्म काहीही नसतात. अशा दुधाचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. म्हणून हा दुध भेसळीचा प्रकार त्वरित थांबला पाहिजे नाहीतर भविष्यात नवीन पिढीसाठी ही घातक बाब ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की खाद्यतेल, सोडा, युरिया आणि खाद्योपयोगी तेल, स्निग्धांशविरहित दूध, युरिया, सोडा, मीठ, निरमा पावडर, साखर आणि पाणी असे खाद्यपदार्थ व काही रासायनिक पदार्थ मिसळून तयार होणाऱ्या दुधामध्ये तेल हे स्निग्धांशाचा स्रोत म्हणून वापरण्यात येते आणि इतर घटक पदार्थ हे स्निग्धांशविरहित दुधाचा स्रोत म्हणून वापरण्यात येतात. अशा प्रकारचे दूध हे गावपातळीवरील दूध संकलन केंद्रातील चाचण्यांमध्ये पास होते. कारण या ठिकाणी फक्त स्निग्धांश आणि स्निग्धांशविरहित घटकच पाहिले जातात, पण अशा प्रकारचे दूध हे शरीरास खूप हानिकारक असते. संयोग क्रियेतून तयार होणारे दूध आणि नैसर्गिक दुध यात जमीन, आस्मानाचा फरक आहे.
तसेच महत्वाचे म्हणजे संयोग क्रियेतून तयार होणाऱ्या दुधाचा रंग जरी नैसर्गिक दुधासारखा दिसत असला, तरी ते दूध चवीला कडवट व त्याचा गंध, वास साबणाच्या पाण्यासारखा येतो. अशा दुधाची सर्वसाधारण तापमानाला साठवणूक केली तर ते दूध फाटते, नासते व त्याला पिवळसर रंग प्राप्त होत नाही. संयोग क्रियेतून तयार होणारे दूध खरबरीत पात्रावर घासले असता फेसाळते, फेस तयार होतो आणि उष्णता दिल्यास पिवळसर रंगछटा प्राप्त होते. त्याचा गंध/वास काहीसा साबणाच्या पाण्यासारखा येतो. अशा दुधाची युरिया, सोडा, साबण चुरा, साखर इत्यादींची भेसळ चाचणी केली तर त्या सर्व चाचण्यांमध्ये भेसळ झालेली दिसून येते. या दुधाचा सामू हा अति विम्लतेकडे असतो म्हणजेच आठपेक्षा जास्त असतो. नैसर्गिक दुधाचा सामू हा ६.६४ ते ६.६८ इतका असतो.
अशा
संयोग क्रियेतून तयार होणाऱ्या दुधाच्या सेवनामुळे होणारे अनेक अपाय होतात मात्र संयोग क्रियेतून तयार होणारे दूध हे दिसायला जरी साध्या दुधासारखे असले तरी चवीला मात्र शंकास्पद वाटते आणि अशा दुधामध्ये पौष्टिक गुणधर्म काहीही नसतात (नैसर्गिक दुधाच्या तुलनेत) भारतीय औषध प्रमाणित संस्थेच्या अहवालानुसार अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे मानवास कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात.
युरियाच्या अतिवापरामुळे, सेवनामुळे मूत्रविकारही जडू शकतात. त्याचप्रमाणे हृदयास व फुफ्फुसासही हानिकारक ठरू शकते.
सोड्याच्या अतिसेवनामुळे लहान मुलांमध्ये वाढीस असणारे प्रथिनांचे (लायसीन) प्रमाण कमी होते, यामुळे शरीरवाढीवर विपरीत परिणाम होतात. म्हणून या दुधात भेसळ करुन दुधाचा गोरखधंदा करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासन, प्रशासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत असे मत व्यक्त केले.