जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील यांचं तिकीट कापून नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणारं असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येतं असून मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक रोहित निकम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. जळगाव शहरातील उमेदवार देण्याबरोबर निवडून येणाऱ्या नव्या चेहऱ्याला संधी देण्याबाबत भाजपात मंथन सुरु आहे.लोकसभा निवडणूकीच्या स्पर्धेत असलेले रोहित निकम हे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे असून त्यांचे नाव जळगाव लोकसभेसाठी निश्चित होण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरातील उमेदवार देण्यावर भर
जळगाव लोकसभेसाठी आजपर्यत कुठल्याच प्रमुख पक्षाने जळगाव शहरातील उमेदवार दिला नसल्याने यावेळेस जळगाव शहरातून उमेदवार देण्यासाठी भाजपात विचार विनिमय सुरु असल्याचं समजतं दरम्यान भाजपाची जळगाव शहरात चांगली ताकद असल्याने भाजपा उमेदवाराला शहरातून चांगला लीड मिळू शकतो आणि जळगाव जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जळगाव शहरातील उमेदवार दिल्यास खासदार म्हणून सेवा देतांनाही सोपं होईल असं गणित यावेळेस मंडण्यात आल्याचं समजतं त्यामुळे भाजपा रोहित निकम यांना लोकसभेला संधी देण्याची शक्यता बाळावल्याचं बोललं जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने रोहित निकम यांना जळगाव लोकसभेसाठी संधी दिली जाऊ शकते त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दिल्लीत भाजपच्या अंतर्गत गटात मोठी खलबत सुरु असून रोहित निकम यांचा नावाचा विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित निकम हे मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रोहित निकम यांना मोठा राजकीय वारसा
रोहित निकम यांना मोठा राजकीय वारसा सुद्धा आहेत . त्यांच्या मातोश्री शैलजा निकम या जिल्हा बँकेचा संचालक आहेत. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर दुसरीकडे रोहित निकम हे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे देखील आहेत. त्यामुळे रोहित निकम यांच्या पाठीमागे त्यांचं वेगळं सामाजिक राजकीय वलय आहे.
रोहित निकम हे स्वतः जळगाव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या संचालक आहेत. ते जिल्हा दूध संघाचे देखील संचालक आहेत. सध्या रोहित निकम जळगाव लोकसभेचे भाजपचे बुथ संयोजक म्हणून काम पाहत आहेत. जळगाव जिल्ह्यात रोहित निकम यांचा मोठा जनसंपर्क आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने रोहित निकम यांना जळगाव लोकसभेची संधी मिळू शकते अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.