महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणासाठी ‘सगेसोयरे‘ संबंधी निर्णयासाठी चालढकलपणा करत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याची चिठठी लिहत घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथे मराठा आरक्षणासाठी 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शिवप्रसाद महादेव थुटे (वय – 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून युवकाच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
शिवप्रसाद थुटे हा युवक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये गावातील सहकारी तरुणासोबत पहिल्यापासून सक्रिय होता. महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणासाठी ‘सगेसोयरे’ संबंधी निर्णयासाठी चालढकलपणा करत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत लिहिलेले आढळून आले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण झोपी गेले असता शिवप्रसाद देखील त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. सकाळी उशीर झाला तरी तो उठला नसल्याने आणि आवाज देऊनही घराचा दरवाजा उघडत नसल्यामुळे त्याच्या बहिणीने खिडकीतून पाहिले असता त्यांना शिवप्रसादने फाशी घेतल्याचे दिसून आले. कुटुंबातील आई-वडील बहिणीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक धावून आले. त्यांनी दरवाजा तोडून त्याला खाली घेतले असता तो मृत झाल्याचे आढळून आले.
दरम्यान, तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करून दुपारी ३ वाजता मुरमा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेची तीर्थपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.