मुंबई – महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये ३० रोजी वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर गेले असतांना त्यावेळी डॉ. पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडीसमोर सादर केला. तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो असं म्हणून त्यांना १ तास बैठकी बाहेर बसवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये MVA च्या तिघा पक्षांची बैठक सुरू होती.कालच्या बैठकीत मिळालेल्या वागणुकीबाबत डॉ. पुंडकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती दरम्यान वंचित आघाडीकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आल्याचे पत्र खा. संजय राऊत यांनी जाहीर केले होते. त्यावर VBA चे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते,अखेर प्रकाश आंबेडकरांनी क्स वर ट्विट करून भाजप-आरएसएसचा पराभव करणे हे VBA चे प्राधान्य असल्याने महाविकास आघाडीत सामील होण्यास होकार दिला आहे.
आगामी महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha 2024 Polls) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी (VBA) अधिकृतपणे महाविकास आघाडी (MVA) मध्ये सामील झाली आहे.प्रकाश आंबेडकरांच्या युतीत सामील होण्याच्या अनेक दिवसांच्या अटकळ आणि चर्चांनंतर आता अधिकृतरीत्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी X वर (पूर्वीचे ट्विटर) ही घोषणा केली. संजय राऊत यांनीही वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाल्याची माहिती दिली आहे.
वंचीत मुळे देशातील हुकूमशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे त्यामुळे एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि नेते प्रकश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा विदर्भ प्रदेशासह काही जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे. आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीला अधिकृत निमंत्रणही देण्यात आले होते.
प्रकाश आंबेडकर यांना दिलेल्या पत्रात काय म्हटलं आहे
देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. 2024 साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच.’
यामध्ये पुढे म्हटले आहे, ‘आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. 30 जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.’