जळगाव,(प्रतिनिधी)- केसीई सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘युवास्पंदन २०२३’ चे उद्घाटन आज सकाळी शिक्षण उपनिरिक्षक जि.प. जळगाव श्रीमती दिपाली पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष मा श्री डी टी पाटील, मा. श्री शशीकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक समन्वयक), प्राचार्य डॉ सं.ना. भारंबे, उपप्राचार्य करुणा सपकाळे , पर्यवेक्षक प्रा आर बी ठाकरे, समन्वयक प्रा स्वाती बऱ्हाटे, प्रा उमेश पाटील व सनेहसंमेलन प्रमुख प्रा महेंद्र राठोड व उपाध्यक्ष एस एस कावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या इमारतीत विद्यार्थ्यांना रांगोळी, मेहंदी व विविध छंद व ललित कला अंतर्गत विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आलेले होते. यांत ॲक्रॅलिक पेंटिंग , ग्लास पेंटिंग याने सर्व प्रेक्षकांचे मन वेधले. पोस्टर प्रदर्शनामध्ये पुजा संतारा हिने ‘स्त्री मुक्ती व स्त्री भ्रुण हत्या’ हा आशय मांडून आत्मचिंतनास प्रवृत्त केले. इ १२ वी कला ची विद्यार्थीनी रुमा मुन्शी हिने ‘जस्टीस फॉर मेन’ हा अनोखा व चिंतनीय असा विषय मांडून सर्वांचे मन खिळवले. फोटोग्राफीमध्ये नेहल चौधरी हिने ‘चिरेबंदी वाडा’ , ‘मातृप्रेम’ , ‘सिद्धार्थ गौतम व विश्वशांती’ या आशयाची चित्तवेधक छायाचित्रे मांडून कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्केच पेंटिंग मध्ये छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेंटिंगने प्रदर्शनामध्ये छाप पाडली. यावेळी रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात अयोध्येच्या राममंदीराची प्रतीकृती , चंद्रयान मोहिम, मोबाईल ॲडिक्शन व Save Earth and Save Girl या रांगोळींनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच मेहंदी स्पर्धा, हॅण्डक्राफ्ट व पुजाथाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ भाग्यश्री भलवतकर व श्रीमती भाग्यश्री होले यांनी केले.
काव्यवाचन व उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत गीता पंडित या विद्यार्थीनीने ‘Go Not to the temple‘ या शीर्षकाची कविता सादर करून सर्वांना आंतर्मुख केले. तसेच विरेंद्र ललीत चौधरी याची ‘क्या खोया क्या पाया’ व चिन्मयी भारंबे हिच्या ‘कसं जगायचं’ या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत निदा पोची व प्रणिता काटोले यांनी प्रभावी भाषण करून सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ विश्वनाथ महाजन , श्रीमती पल्लवी टोके यांनी केले.
यावेळी फुड फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते. वैविध्यपुर्ण खाद्य पदार्थांची रेलचेल यावेळी अनुभवयांस मिळाली. या फुड फेस्टीवलचे प्रमुख आकर्षण बटर पापडी, कटोरी चाट, मोमोझ, पोटॅटो फिंगर्स व दाल पक्वान हे होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ सुरेखा पालवे व डॉ संगिता पाटील यांनी केले.
हास्यप्रधान खेळांमध्ये…. विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात फ्रॉग जम्प रेस, फिलिंग वाटर,बॉटल व कार्ड बोर्ड रेस स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ नचिकेत सुर्यवंशी व डॉ विनय तिवारी यांनी कामकाज पाहिले.
यादरम्यान ‘मनवा लागे-एक सुरिली मैफिल’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यांत प्रा रुपम निळे , प्रा इशा वडोदकर, राजेंद्र निकुंभ व प्रा मयुरी हरिमकर, समर्थ पाटील, वैशाली मतलाने , नीरज शिरसाठ यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमामध्ये रंगत आली. सुत्रसंचालक श्रावणी फडणीस व गीता पंडित यांनी केले.
त्याचबरोबर गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात एकुण 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी परिक्षक म्हणून श्री योगेश मर्दाने यांनी कामकाज पाहिले.
उद्या दिनांक ३०/१२/२०२३ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून यात भारतीय प्रादेशिक पारंपारीक वेशभूषा, गीतगायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. उद्या पारितोषिक वितरण समारंभाने या सनेहसंमेलन समारोप होणार असून प्रमुख अतिथी कनिष्ठ लेखापरिक्षक लेखाधिकारी मा. रविंद्र घोंगे व केसीई सोसायटीचे सचिव मा. ॲड प्रमोद पाटील उपस्थित राहणार आहे.