जैन इरिगेशन व गजानन ठिबकतर्फे जळके येथे निर्यातक्षम केळी पीक परिसंवाद
जळगाव- शेतकऱ्यांनी उच्च कृषी तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन स्वीकारून भरघोस उत्पादन घ्यावे व भारताच्या प्रगतीत हातभार लावावा असे आवाहन डॉ. एच. पी. सिंग यांनी केले. जळके येथील संत गजानन महाराज मंदीर परिसरातील शेतामध्ये आयोजित ‘निर्यातक्षम केळी पीक परिसंवाद’ उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते. जैन इरिगेशन व गजानन ठिबक जळके यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजला होता. यावेळी व्यासपीठावर श्री. गजानन ठिबक सिंचनचे संचालक पी. के. पाटील, तालुका कृषी अधिकारी झांबरे, प्रगतशील शेतकरी बी. ओ. पाटील, शरद पाटील, जैन इरिगेशनचे सहकारी के. बी. पाटील, डी. एम. बऱ्हाटे, मोहन चौधरी उपस्थित होते.
आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. गजानन ठिबक सिंचन फर्मचे संचालक पी. के. पाटील यांनी केळी पीक परिसंवाद आयोजनाबाबतचा उद्देश प्रास्ताविकात सांगितला. जळगाव विभागाचे विभागीय व्यवस्थापक डी.एम. बऱ्हाटे यांनी ऑटोमेशनबाबत माहिती सांगून आधुनिक सिंचन व्यवस्थापन या विषयावर सोदाहरण मार्गदर्शन केले. ऑटोमेशनमुळे पाणी, खत यांचे अचूकपणे नियोजन करता येते. काम सहजपणे चालविता येते. मोबाईल किंवा संगणकावर प्रोग्राम केलेला असल्याने मानव विरहीत काम होते त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते. ऑटोमेशनचे अनेक फायदे मार्गदर्शनपर सुसंवादातून सांगितले.
केळी लागवडीपासून तर केळी काढणीपूर्व व काढणी पश्चात सर्व टप्प्यांबाबत त्यांनी तांत्रिक माहिती दिली. खते, विद्राव्य खते, केळी पिकाच्या वाढीसोबत द्यावयाच्या पाण्याच्या पाळ्या याबाबत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. केळी पिकावर येणारे रोग त्यासाठी लागणाऱ्या औषधींच्या मात्रा, घ्यावयाची काळजी याबाबत देखील त्यांनी सांगितले. जगाच्या तुलनेत भारतातील केळी उत्पादनाची तुलना देखील करून दाखविली. काढणीचे तंत्र, पॅकेजिंग आणि निर्यातक्षम केळी याबाबत देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या मनातील शंकांचे समाधान केले. यावर्षी 56 हजार टिश्युकल्चर केळी रोपे खरेदी करणारे नेरी येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र रामदास पाटील यांचा प्रातिनिधीक सत्कार जैन इरिगेशनच्यावतीने डी.एम. बऱ्हाटे व के.बी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. केळी पिकासाठी ठिबक सिंचनाचा पुरस्कार शासनाने केला आहे. ‘केळी तिथे नळी’ यासह गट शेती, यांत्रिकीकरण, फळबाग, सामुहीक गोठा व व्यवस्थापन या विविध योजनांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले. पंचक्रोशीतील 200 हून अधिक केळी उत्पादक शेतकरी या परिसंवादास उपस्थित होते.