जळगाव– शहरातील साफसफाई आणि कचरा संकलनासाठी मनपा प्रशासनाने वॉटर ग्रेस कंपनीला एकमुस्त ठेका दिला आहे.गेल्या पाच दिवसांपासून तीन महिन्याचे वेतन थकल्यामुळे कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.साफसफाई कामगारांनी कामबंद ठेवले असले तरी घंटागाडी सुरु आहे.त्यामुळे मंगळवारी सकाळी कामगारांनी टि. बी. रुग्णालयातील डेपो समोर आंदोलन करून घंटागाडी काढण्यास मज्जाव केला.त्यामुळे सफाई कामगार आणि घंटागाडीवरील चालक यांच्यात जोरदार वाद झाला.तसेच एकाला मारहाण करण्यात आली . कामगाराच्या आंदोलनामुळे शहरात कचराकोंडी होवू लागली आहे.
जळगाव महापालिकेने शहरातील दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेसाठी नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला 75 कोटींचा पाच वर्षांसाठी मक्ता दिला आहे. सुमारे चार महिन्यांपासून मक्तेदाराचे काम सुरू असून, ते समाधानकारक नसल्याने सर्वत्र त्याची ओरड होत आहे. त्यात अडीच ते तिन महिन्यांपासून कामगारांचे मक्तेदाराने वेतन दिले नसल्याने त्यांच्यात असंतोष पसरून काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे गेल्या पाच दिवपासून शहरात स्वच्छता होत नसल्याने अनेक ठिकाणी कचरा साचलेला, तर गटार कामगार संपावर असल्याने गटारी तुंबल्याने शहरातील अनेक भागांत डास, दुर्गंधीचे प्रमाण वाढून साथरोगांचे आजार पसरू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यात आज सर्व 85 घंटागाड्या बंद असल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न अधिकच जटील बनला आहे.