संभाजीनगर,(प्रतिनिधी)- ‘आधी अजित पवारांविरोधात बोलताना चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचे आणि आता अजितदादा किसिंग किसिंग सुरु आहे, अशा शब्दांत दानवेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत हल्लाबोल केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्यावर भाजपाने भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले होते दरम्यान आरोप केल्यानंतरही अजित पवारांना सत्तेत सहभागी करुन घेणाऱ्या भाजपवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही यावेळी दानवेंनी निशाणा साधला. ते म्हणाले, “भागवत कराड हे चांगला माणूस आहेत पण चांगले नेते नाहीत. सोमय्या आणि गवळी यांच्यावर आरोप करणारे सीए उपेंद्र मुळे यांच्या भेटीवरुन त्यांनी भाष्य केलं आहे. सोमय्या गुप्त दौरे करतात कारण ते शिवसेनेला घाबरतात, त्यांना खुला दौरा करायचा असता तर ते शहरात येऊ शकले नसते.
भाजप आपला ग्राहक वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. या पक्षात आता मुळचे लोक बोटावरच मोजण्याइतपतच राहिले आहेत. हा पक्ष मोठा करणारे लोक कुठे आहेत? असा सवाल करताना या सर्व गोष्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करणाऱ्या असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. कॅगचा अहवाल समोर आला आहे त्यामुळं आता भाजपचे टोलनाकेही समोर येतील, असा टोलाही त्यांनी लागावला.
लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून कोणी बसलेलं असलं तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच जिंकणार असंही दानवेंनी म्हटलं आहे. शिंदे गटाला आणि भाजपला आम्ही पुरुन उरु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.