मुंबई । राज्यात राजकीय भूकंप घडवून आणत अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीतील या फुटीला 15 दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच अजित पवार राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. वाय. बी. चव्हाण सेंटरवर हे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आणि मंत्रिपदाची शपथ घेणारे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शरद पवार यांचा आश्रय या मंत्र्यांना मिळणार का आणि समजोता होणार का? हे पाहावे लागणार आहे.
उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी अजित पवारांसह सर्व मंत्री शरद पवारांना भेटायला पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल पटेल, संजय बनसोडे, आणि दिलीप वळसे-पाटील हे सर्व नेते उपस्थित आहेत.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाण्यापूर्वी देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार सर्व मंत्र्यांना घेऊन वाय बी चव्हाण सेंटरला दाखल झाले आहेत. या सर्व मंत्र्यांना शरद पवाराचा आशिर्वाद मिळणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.