भुसावळ : एखादा खाद्यपदार्थांचा किंवा इतर दैनंदिन वस्तूंचा टँकर उलटलेला दिसला, तर लोकांची झुंबड उडालेली दिसते. असाच काहीसा प्रकार भुसावळ शहरातील खुशबू हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळाला आहे.
एका चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या नादात कच्चे खाद्यतेल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र तेलाचा टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. त्यानंतर अनेकांनी तेल घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान सोयाबीनचे तेल घेऊन जाणारा टँकर गुजरातमधील अंजिराकडे जात होता. यादरम्यान भुसावळ शहरातील खुशबू हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्गावर एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर उलटला.
टँकर उलाटल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतचं याची बातमी शहरासह परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे. यामुळे परिसरातील लोकांनी मिळेल ते भांड हातात घेऊन घटनास्थळी धाव घेत तेलावर डल्ला मारला.
तेल हे रिफायनरीमध्ये जात असल्यानं ते अशुद्ध आणि कच्च तेल होतं.तेल अशुद्ध असल्याचं माहित असतानाही नागरिकांनी ते भरून नेलं नागरिकांनी एकच झुंबड केल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तर याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमऱ्यात कैद केला.