नवी दिल्ली- गांधी कुटुंबाला असलेली एसपीजी सुरक्षा हटवण्यात आल्याने त्यावर काँग्रेस नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच प्रियांका गांधी वड्रा यांच्या घरात सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन काही अज्ञात व्यक्ती गेल्या आठवड्यात घुसल्या होत्या, अशी धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत गांधी कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) तक्रार करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे.
दिल्लीतील लोधी इस्टेट येथे प्रियांका गांधी यांचे निवासस्थान आहे. गेल्या आठवड्यात याच निवासस्थानी काही अज्ञात व्यक्ती कोणाचीही परवनागी न घेता आले होते. सेल्फी घेण्यासाठी या व्यक्तींनी आग्रह धरला होता. त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता अपॉइंटमेंट न घेताच ते सगळेजण प्रियांका यांच्या घरात आले होते, असे स्पष्ट झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. या घटनेमुळे गांधी कुटुंबाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गांधी कुटुंबातील सर्व सदस्यांना एसपीजी सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच ही सुरक्षा काढून त्याऐवजी गांधी कुटुंबाला झेड-प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावर काँग्रेस नेत्यांकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला व निदर्शनेही करण्यात आली. हा वाद थांबलेला नसतानाच प्रियांका यांच्या घरातील घुसखोरीचा प्रकार समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.














