पाचोरा (प्रतिनिधी) – रोटरी क्लब च्या जागतिक समाजसेवी संघटन मध्ये देशभरात अनेक विविध उपक्रम सातत्याने सुरू असून प्रत्येक रोटरी क्लब आपापल्या कार्यक्षेत्रात विविध लोकोपयोगी उपक्रम घेण्यासाठी धडपडत असतो. रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे कार्य प्रशंसनीय असून पुढील काळात ग्रामीण भागात प्रभावी समाजकार्य करण्यासाठी लोकसमूहाला सोबत घेऊन प्रकल्पांची दिशा ठरवा,” असे मार्गदर्शन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रो. राजेंद्र भामरे यांनी पाचोरा येथे केले.येथील रोटरी क्लबला दिलेल्या भेटी निमित्त आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगावला काल तारीख १डिसेंबर २०१९ रोजी प्रांतपाल राजेंद्र भामरे व उप प्रांतपाल राहुल कुलकर्णी यांनी भेट देऊन क्लबच्या कार्याचे परीक्षण केले. सायंकाळच्या सत्रात प्रांतपाल यांच्या अध्यक्षतेखाली स्वप्नशिल्प रेसिडेन्सी व बँक्वेट हॉल पाचोरा येथे सायंकाळी ७ वाजता रोटरीतर्फे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.डॉ. भूषण मगर-पाटील सेक्रेटरी रो. डॉ. बाळकृष्ण पाटील मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या दोन पाल्यांना एकास आय. ए. एस. व दुसऱ्यास आय.ई. एस. करणारे पालक सत्यवान महाजन तसेच जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा विजेता सलमान शेख यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पाचोरा रोटरी क्लबने दत्तक घेतलेल्या कोल्हे ता. पाचोरा येथील प्राथमिक शाळेला ग्रंथालयासाठी बारा हजार रुपयांची ग्रंथसंपदा भेट देण्यात आली. कोल्हे गावात स्थापन केलेल्या रोटरी कम्युनिटी क्लब चे सदस्य व सरपंच यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. कोल्हे शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वॉटर बॅग व लेखन साहित्य भेट देण्यात आले. पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या क्लबचा अर्धवार्षिक अहवाल वाचून दाखवला. रमेश बाफना यांचे समयोचित भाषण झाले. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉक्टर भूषण मगर पाटील यांनी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन आगामी काळातील उपक्रमांचा उल्लेख करून अध्यक्षांकडून ग्लोबल ग्रँड च्या माध्यमातून मोठे उपक्रमांसाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. उप प्रांतपाल रो डॉ राहुल कुलकर्णी यांनी प्रांतपाल श्री भांमरे यांचा परिचय करून दिला. डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रो. राजेंद्र भामरे यांनी रोटरी क्लबच्या यशस्वी संचलनासाठी सदस्यांमधील सुसंवाद, ऐक्य,व्यवस्थापन व संचलन असावे असे सांगितले. जागतिक स्तरावर रोटरीतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. शिवाजी शिंदे यांनी जनसंवाद चे सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ सदस्य रो राजेश मोरे यांनी आभार मानले .राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.