मुंबई- महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता गोव्यातही लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खा. संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात महाआघाडीची मोट बांधणाऱ्या नेत्यांमध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आज सकाळी राऊत यांनी हा दावा केला. ‘गोव्यातही भाजपाने अनैतिक पायावर आधारलेले सरकार स्थापन केलेले आहे. त्यामुळे शिवसेनेचे महाराष्ट्रानंतर आता मिशन गोवा असेल. आताच माझे सुधीर ढवळीकरांशी बोलणं झालं आहे. गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे प्रमुख विजय सरदेसाईंसह चार आमदार आमच्या संपर्कात आहेत,’ असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.