मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी एक आदेश काढला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी महामंडळाच्या चालक, वाहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. जे चालक, वाहक स्वच्छ गणवेष घालून येणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा असे आदेशात म्हटलं आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, गेल्या चार वर्षापासून एसटीच्या चालक, वाहकांना गणवेषच (ड्रेस) देण्यात आलेला नाही. असे असताना आता अचानक आदेश काढून कारवाईची तंबी देण्यात आल्याने राज्यातील एसटी महामंडळाच्या चालक, वाहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात एसटी महामंडळात एकूण ६० हजारांवर चालक वाहक (ड्रायव्हर, कण्डक्टर) सेवारत आहेत. अलिकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना वर्षातून दोन गणवेष दिले जायचे. धुलाई भत्ताही मिळायचा. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना एसटीच्या चालक वाहकांना गणवेष देण्यात आला. त्यावर ठिकठिकाणी रेडिअम, डिझाईन असल्याने हा गणवेष टीका वजा चर्चेचा विषय ठरला होता.
हे पण वाचा
हवामान खात्याकडून आनंदाची बातमी! यंदा सरासरी पाऊस पडणार, मान्सूनच्या आगमनाची तारीखही आली समोर
ग्राहकांना मोठा धक्का! सोन्या-चांदीत विक्रमी वाढ; तपासून घ्या आजचा नवीनतम दर
सरकारने कर्मचाऱ्यांना दिला 440 व्होल्टचा शॉक ! मोठे नुकसान होणार? नेमकं काय आहे
महिला चालक वाहकांचा गणवेष शाळकरी मुलींसारखा दिसत असल्याचीही ओरड झाली होती. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून मात्र हजारो चालक-वाहकांना गणवेषच मिळाला नाही. त्यामुळे बहुतांश चालक वाहक आपले नेहमीचे कपडे घालून कर्तव्यावर येतात. काही जण नेम प्लेट, बॅज (बिल्ला) अन् लायसेन्सही जवळ बाळगत नसल्याचे ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर, एसटीचे (वाहतूक) महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील ३० विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून ‘जे चालक, वाहक स्वच्छ गणवेष घालून येणार नाही, त्यांच्यावर कारवाई करा’, असे आदेश दिले आहेत. या कारवाईची स्वतंत्र नोंद करून ती महाव्यवस्थापक कार्यालयाला कळवा, असेही या आदेश वजा पत्रात नमूद आहे.