नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं असून यामुळे दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संखेत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. बुधवारी दिवसभरात देशात कोरोनाचे ४ हजार ४३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
चिंताजनक बाब म्हणजे या कालावधीत १५ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. देशात तब्बल १६३ दिवसानंतर ४ हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी ४-४ रुग्ण आणि छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी १-१ रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्गामुळे (Corona Virus) देशात आतापर्यंत एकूण ५ लाख ३० हजार ९१६ मृत्यू झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत ४ हजारांहून अधिक आढळून आलेल्या रुग्णांमुळे आता देशातील कोरोना रुग्णांची सक्रीय रुग्णसंख्या २३,०९१ वर पोहचली आहे.
दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढला
बुधवारी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली. दिल्लीत २४ तासांत ५०९ लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्ह दर २६.५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. एका दिवसापूर्वी हा पॉझिटीव्हिटी दर १५.६४ टक्के इतका होता. म्हणजेच, २४ तासांत पॉझिटिव्हिटी दर १०.९ टक्क्यांनी वाढला आहे.