नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची घोषणा केली होती. आता ही योजना काल म्हणजेच 1 एप्रिल पासून सुरु झाली असून याबाबत वित्त मंत्रालयाने राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. या योजनेत 31 मार्च 2025 पर्यंत महिला किंवा अल्पवयीन मुलीच्या नावाने खाते उघडता येईल.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत महिलांना केवळ दोन वर्षांच्या डिपॉझिटवर 7.5 टक्के व्याज मिळेल. या स्किमच्या डिटेल्सनुसार, यामध्ये केवळ महिलाच अकाउंट ओपन करु शकता. तसंच पालक अल्पवयीन मुलीच्या नावाने हे अकाउंट उघडू शकतात.
या योजनेत 31 मार्च 2025 पर्यंत महिला किंवा अल्पवयीन मुलीच्या नावाने खाते उघडता येईल.
जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या अकाउंटमध्ये किमान 1,000 रुपये ते कमाल 2 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यासोबतच, या योजनेत खातेदार हा सिंगल अकाउंट होल्डर असावा. योजनेतील गुंतवणूकदारांना वार्षिक 7.5 टक्के व्याज दिले जाईल आणि व्याजाची रक्कम प्रत्येक तिमाहीनंतर खात्यात ट्रान्सफर केली जाईल.
दोन वर्षांनी योजनेच्या मॅच्योरिटीनंतर, फॉर्म-2 अर्ज भरल्यानंतर खातेदाराला रक्कम दिली जाईल. योजनेच्या कालावधीचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खातेदाराला 40 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय असेल. खातेदार अल्पवयीन असल्यास, पालक फॉर्म-3 भरल्यानंतर मुदतपूर्तीनंतर रक्कम काढू शकतात.