यावल : यावल तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आलीय. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
काय आहे नेमकी घटना?
जागृत मुंजोबा देवस्थान असलेल्या यावल तालुक्यातील अट्रावल येथे काही समाजकंटाखानी आज पहाटच्या सुमारास महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुमारे दहा-बारा जणांच्या जमावाने पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास हा प्रकार केला. त्यांनी पहिल्यांदा येथील पथदिवा फोडून नंतर पुतळ्याची तोडफोड केली. हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या जमावाने या ग्रामस्थांना मारहाण करत पलायन केले.
काही मिनिटांमध्येच ही वार्ता परिसरात पसरताच दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुफान हाणामारी झाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तथापि, अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याने लवकरच वातावरण नियंत्रणात आले.
पोलीस प्रशासनाने या संदर्भात येथे वातावरण नियंत्रणात असल्याचे सांगून कुणीही या प्रकरणाच्या बाबत अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. आज अट्रावलमध्ये जो प्रकार घडला, त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येत असून याबाबत कुणी सोशल मीडियात दिशाभूल करणारी माहिती प्रसारीत करू नये असेही पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.