कोहिमा : नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्यात सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणत्याच विरोधी पक्षाला दोन अंकी संख्या गाठता आलेली नाही. यामुळे राज्यात सर्वपक्षीय सरकार स्थापन केलं जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचा कट्टर विरोधक मानला जात असला तरी नागालँडमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणजे राज्यात कोणताही विरोधी पक्ष नसेल. राष्ट्रवादी आणि जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अटीशिवाय हा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात जिंकलेल्या सर्व पक्षांचं सरकार येणार आहे. पहिल्यांदाच राज्यात विरोधी पक्ष नसणार आहे. हे या निकालाचं वैशिष्ट ठरणार आहे.
नागालँड विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक संख्येने राजकीय पक्ष सहभागी होत असतानाही, नागालँडमधील नवीन सरकार विरोधी-विरहित सरकारकडे वाटचाल करत आहे. यामध्ये जवळपास सर्वच पक्षांनी एनडीपीपी-भाजप युतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. एनडीपीपी आणि भाजपने 2 मार्च रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये अनुक्रमे 25 आणि 12 जागा जिंकल्या आणि 60 सदस्यांच्या सभागृहात युतीची एकूण संख्या 37 झाली.
बावनकुळे काय म्हणाले?
भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीची माहिती दिली आहे. नागालँडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत आहे. तिथल्या स्थानिक समीकरणानुसार दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. नागालँडचा प्रयोग महाराष्ट्रात होण्याची परिस्थिती नाही, सध्या आम्ही सत्तेत मजबूत आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.