चोपडा (प्रतिनिधी) :– तालुक्यातील अडावद पोलीस स्थानकाच्या हद्दीत अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अडावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बिसना बांगड्या बारेला (वय ४१, रा. शेवरा बु. ता.चोपडा) असे मयताचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिसना बांगड्या बारेला हे २ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावालगतच्या जंगलात आपल्या जनावरांच्या शोधात गेले होते. याचवेळी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अस्वलाने बारेला यांच्या चेहऱ्यावर चावा घेतल्याने त्यांचे दोघं डोळे फुटले. अस्वलाच्या हल्ल्यामुळे मयताचा चेहरा अत्यंत विद्रूप झालेला होता.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपचाराकामी बारेला यांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असता त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सीएमओ. डॉ. सागर पाटील (उपजिल्हा रुग्णालयात चोपडा) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक जयदीप राजपूत हे करीत आहेत.